नेहमीचेच
काल मी मेट्रोतून येत असताना एक दहा वर्षाचा मुलगा आणि त्याची आई माझे सहप्रवासी होते.
दहा वर्ष म्हणजे काही 'समज नसणारं' वय नाही मानता येणार आजच्या काळात.
तो मुलगा त्याच्या घाण बुटांसह सीटवर उभा राहून वरच्या कड्यांना लोंबकळत होता.
दोन मिनिटे झाली, तीन झाली ..
पाच मिनिटांनी मी त्या मुलाला म्हटलं, "बेटा, इस सीटपे आगे लोग बैठेंगे. आप गंदे शूज रखकर उस सीटपर खडे मत रहना, सीट गंदा हो रहा है वह ..."
मी हे शांत समजुतीच्या स्वरांत बोलले, कारण 'मूल लहान आहे, मी मोठी आहे' याच मला भान होत.
त्यावर त्या मुलान लगेच मला दरडावून सांगितलं, "इस सीट पे मेरा नाम लिखा है'.
मला एकदम त्याने माझ्या कानफाटात मारल्यासारखं वाटलं. तरीही मी हसून पुन्हा म्हटलं, "बहुत तेज दिमाग है आपका ..."
त्याच्या आईने त्याला जरा दटावलं अस बोलण्याबद्दल - 'ऐसा मत बोलना' असं ती म्हणाली. पण घाण बूट त्या सीटवर ठेवण्याबाबत काहीच नाही.
आसपासच्या स्त्रियांनी माझ्याकडे अपेक्षेन पाहिलं. आता भांडण रंगणार, काहीतरी करमणूक होणार अशी त्यांची अपेक्षा होती बहुतेक.
मी शांत राहिले. एका मर्यादेपलिकडे डोक भिंतीवर आपटण्यात काही अर्थ नसतो हे मला माहिती आहे.
माझ्या मनात आलं - हे पोरग पुढे काय प्रकारचं नागरिक बनणार हे स्वच्छ दिसतच आहे. अशा प्रसंगी आई-वडिलांची, अन्य पालकांची भूमिका काय असावी? काय असते साधारणपणे?
आपली फक्त 'बघ्यांची' भूमिका असावी? का आपण प्रयत्न करावा बदल घडवून आणण्याचा? ते करताना कटुता कशी टाळायची? स्वतःला मनस्तापापासून कस अलिप्त ठेवायच?
हे खरे तर नेहमीचेच .. म्हणून मीही निर्ढावले आहे का या सगळ्याला?
काय वाटतय इतरांना?
.jpg)
{संताप आणणारे 'बघे'}
"नेहमीचेच" खरेतर हे शीर्षकच खूप काही सांगून जाते. मुलगा (काही प्रसंगी अशा वयातील मुलींचाही आगावूपणा पाहिलाय मी) सार्वजनिक स्थळी जे वर्तन करतो आहे ते आक्षेपार्ह आहे हे समजण्याइतकी आजची "आई' नक्कीच सुशिक्षित असते. पण होते असे की, घरी असे लाडोबा वाढत असताना त्याना तिथेच पायबंद घातला गेला नसेल तर मग बाहेरही आपली सद्दी अशीच चालत राहणार असा एक प्रकारचा उर्मटपणा त्यांच्या अंगी वसत जातो. तुम्ही मेट्रोचे उदाहरण दिले आहे जे पुरेसे बोलके आहे, पण शाळेतही ते कार्टे असाच मस्तवालपणा करत असणार यात संदेह नाही.
पण तुम्ही त्याला सौम्य भाषेत दिलेली समज त्याला नसली तरी निदान त्याच्या मातेपर्यंत काही प्रमाणात गेली हे ठीक झाले. आजुबाजूच्या कम्युटर्सना तर नित्याच्या प्रवासात चला आता जरा तिखटमीठाचे भांडण बघायला मिळणार याचा विकृत आनंद होत असतो, त्यांच्याकडून 'समाजातील अशा चुकीच्या गोष्टीं" ना कुणीतरी पायबंद घालण्याचा यत्न करीत आहे याच्याशी काही देणेघेणे नसते.
पुण्यातील कात्रज ते सांगवी मार्गावरील पी.एम.टी.च्या बसमधून मी प्रवास करीत होतो. मुलाचे घर काटेपुरम भागात आहे. कात्रजपासून तेथील तिकिट १८/- रुपये असून त्यासाठी कंडक्टरकडे वीसची नोट दिली. त्याने तिकिट फाडले पण २ रुपये न देता पुढील प्रवाशांना तिकिटे देण्यात गर्क झाला. मला वाटले गर्दीमुळे वा सुट्टे नाणे नसल्याने त्याने लागलीच दोन रुपये परत केलेले नाहीत, पण पुढे युनिव्हर्सिटी स्टॉप आल्यावर निम्म्याहून अधिक बस रिकामी झाली आणि कंडक्टरने मोकळा श्वास घेतला, आपल्या सीटवर बसला. पण दोन रुपये देण्याचे नाव नाही. माझ्या स्टॉपच्या अलिकडे मी त्याला त्याबद्दल हटकले तर जणू मी काही मोठा गुन्हाच केल्याच्या आविर्भाव करीत म्हणाला, 'अहो राव, कसले दोन रुपये मागता? सुट्टे नाहीत, हेड ऑफिसमधून घ्या." हे कसले उत्तर ? कुठे आहे ते हेड ऑफिस ? त्याचा खिसा तर चिल्लर नाण्यांनी वाकल्याचे दिसत होता. मी संतापून गाडी थांबवा आणि पोलिस स्टेशनवर चला, असे सुनावल्यावर लागलीच आजुबाजूचे भाऊराव, दाजीराव आणि काही आक्काही आता गाडी थांबणार या भीतीने "जाऊ द्या ओ रावसाहेब, कशाला दोन रुपयासाठी तुम्ही तर मन दाखवता ?" छान ! म्हणजे मी माझे हक्काचे दोन रुपये परत मागतोय हा जणू गर्हणीय गुन्हाच जणू ! आवाज आणखीन् वाढल्यानंतर स्वतःशीच पुटपुटत कंडक्टरने दोनचे नाणे आतावर (शिव्या देतच) टिकविले. माझा तर त्या प्रवासाचा मूडच नष्ट झाला. कंडक्टरमुळे नव्हे तर, त्याच बसमध्ये कॉलेज आणि विद्यापीठ इथे शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होते, त्यांच्यापैकी कुणालाच मी न्यायासाठी वाद घालत आहे याची फिकीरच नव्हती. मी दोन रुपये मागतो म्हणजे त्या कंड्क्टरवर घोर अन्यायच करीत आहे.
पुणे कोल्हापूर हाय वे वर एकामागोमाग चार टोलनाके येतात. तिथेही असाच प्रकार. दोन ठिकाणी कारसाठी रुपये ४८/- असा टोल आहे. पन्नासची नोट कारचालकाने दिली की त्याला त्याचे हक्काचे दोन रुपये न देता, कुत्राही ज्याला तोंड लावणार नाही अशी बनावट कंपन्याची दोन चॉकोलेट्स त्याला दिली जातात. त्याविषयी एखाद्या कारचालकाने "मी हे चॉकोलेट्स घेणार नाही" असे सुनावले तर लागलीच त्याच्या पाठीमागे पाळीत असलेल्या कार्स, ट्रक्स, आरामगाड्या यांचा कर्कश ठणठणाट सुरू होतो. "घ्या की राव, कशाला डोकं खाता, काय लागलं तेवढं दोन रुपयाचं महत्व ?" आदी उपदेशाचे डोस झरझर पाजले जातात. बघ्याना हे कसे कळत नसेल की प्रश्न दोन रुपयाचा नसून कुठल्यातरी तत्वाचा आहे ?
असे हे 'बघे' (त्यातही अधिक सुशिक्षित) सर्वत्र बजबजलेले असल्याने सामाजिक स्तरावरील अशी ओरबड फसफसून वाढत चालल्याचे आढळत आहे. निर्ढावत चाललो आहोत आपण या सार्यामुळे.
अशोक पाटील
{अशोक सर, तुमचा सविस्तर}
अशोक सर, तुमचा सविस्तर प्रतिसाद खरच वाचनीय आणि मननीय आहे. तुम्ही पुण्यातल्या बसचा आणि कोल्हापूर टोल नाक्यावरचा जो अनुभव सांगितला आहे - तोही नेहमी येतो. आपली वाईटाविरुद्ध लढण्याची सामाजिक आणि व्यक्तिगतही इच्छाशक्तीच संपली आहे की काय अशी कधीकधी शंका येते. आपण निर्ढावलेले नाही हाच जणू गुन्हा आहे अशा त-हेने आपल्याकडे पाहिले जाते आपण असे विषय लावून धरतो तेव्हा. पण 'एकला चलो रे' जे अयोग्य वाटते त्याविरुद्ध किमान आवाज तरी उठवत राहिलाच पाहिजे आपण - शक्य असेल तेथे आणि त्या त्या वेळी.
{सविता ~ मला जितका संताप त्या}
सविता ~ मला जितका संताप त्या मेट्रो प्रवासातील मुलाच्या आईचा तसेच पीएमटी कंडक्टर, टोल कलेक्टर्सचा येतो त्याचा दसपटीने आजुबाजूच्या "बघ्यां" चा येतो. एरव्ही सरकारच्या कार्यपद्धतीवर, नोकरशाहीच्या खाबूगिरीवर, लाल फित कारभारावर हमरीतुमरीवर येऊन वादवीराचा बहुमान पटकाविणारी कॉलेजकुमार, कुमारी आणि विविध ठिकाणी नोकरी करणार्या या मंडळींना एखादा माणूस दुसर्या माणसाच्या अपप्रवृत्तीबद्दल एकट्यानेच भांडत असताना त्याचे काहीतरी या प्रकरणी बरोबर असून त्या कडक्टरविरूद्ध आपलाही आवाज दिला पाहिजे, हे याना कसे समजत नसेल ? "दोन रुपयांसाठी हा माणूस आज आपल्याला ऑफिसला जाण्यास उशीर करायला लावणार" अशीच यांची या प्रकरणाकडे पाहण्याची दृष्टी. या विचाराने डोके भणभणून जाते.
त्याच सायंकाळी मग मुलगा आणि त्याच्या घरी जमलेल्या अन्य चार मित्रांना, त्यांच्या अर्धांगिनींना (सारेच चांगले शिकलेले, चांगल्या ठिकाणी, चांगल्या पगारावर नोकरी करणारे आहेत) हा किस्सा सांगितल्यावर जे कळाले ते धक्कादायकच होते. त्यांच्याकडून असे समजले की गेली कित्येक वर्षे पी.एम.टी. कंडक्टर्सकडून हा एक-दोन रुपये परत ने देण्याचा प्रकार राजरोस सुरू असून कुणीच कसलीही तक्रार करत नाहीत. कारण ? परत तेच. "कशाला दोन रुपयांसाठी वाद घालत बसा !" मी सर्वच कंडक्टर्स एकाच माळेचे मणी असतील असे म्हणणार नाही, पण असे करणार्यांचा आकडा निश्चित्तच दुर्लक्षणीय नाही. याचा अर्थ असाही होऊ शकतो की या नव्याने नोकरी करणार्या पोरापोरींनीच कंडक्टर्स मंडळींच्या या बेताल सवयीला खतपाणी घातले असून माझ्यासारखा एखादा सीनिअर त्या प्रथेविरूद्ध आवाज करतो म्हणजे एकप्रकारे मूर्खपणाच करतो आहे, असाच समज या तरुणांचा होत जाणार.
परवाच्या स्वारगेट एस.टी. प्रकरणातील तो सो-कॉल्ड मनोरुग्ण संतोष माने याने तसले भयानक कृत्य का केले असेल यावरील एका जालीय चर्चत (मीमराठी नव्हे) काहीनी अकलेचे तारे असे तोडले होते की एस.टी.च्या ड्रायव्हर कंडक्टरना अल्प वेतन मिळते, पुण्यासारख्या ठिकाणी महिना आठ हजारात यांचे कसे भागणार ? शिवाय ड्युटीचे बारा तास, दमलेले असतात इ.इ. ~ अरेच्या, हे कसले जस्टिफिकेशन ? एस.टी.कडे पन्नास हजार कर्मचारी आहेत, उद्या प्रत्येक डेपोतील ड्रायव्हर मग त्यामुळे 'माने' होऊ पाहात असेल तर ते चालेल ? त्यांच्या संघटनाही कार्यशील आहेत, ते पाहून घेत असतील ना अपुर्या पगाराचे आणि ड्युटी अवर्सचे प्रश्न ! पगार कमी असतीलही पण म्हणून संतोष मानेच्या कृत्याला पाठीशी घालण्याचा हा प्रकार म्हणजे "बघेगिरी" चे एक उत्तम उदाहरण.
लकडी पुलावरील सैनिक आणि स्थानिक पोलिस यांच्यात झालेल्या तू-तू-मै-मै च्यावेळीही "बरे झाले, च्यामारी या पोलिसांना मार बसला ते !" अशा वृत्तीनेच हे 'बघेराव' त्या प्रकरणाकडे पाहात होते. सैनिकांचे जरूर चुकले आहे, त्याबद्द्ल मिलिटरी कोर्टाकडून त्याना आवश्यक ते शासन होईल (वा ना होईल), तो भाग निराळा. पण या ठिकाणी त्यानी पोलिस चौकीचे केलेले नुकसान आणि काही पोलिसांनी केलेली शारीरिक मारहाण ही सर्वसामान्य नागरिकांनी निषेधार्हच मानली पाहिजे. पण 'बघ्यां'ना यात सुख इतकेच की जे मी करू शकत नाही ते सैनिकानी केले म्हणून त्याबद्दल लपूनछपून टाळ्या वाजवायच्या.
ही विकृती झाली. दुर्दैवाने ती कमी न होता वाढती आहे हे ज्यादाचे दु:ख.
अशोक पाटील
{दुर्दैवाने विकृत वागणारे आणि}
दुर्दैवाने विकृत वागणारे आणि बघे हेच बहुसंख्य आहेत आज भवताली....
{माझे बसचे तिकिट रु.९/-}
माझे बसचे तिकिट रु.९/- आहे.
१० रु. ची नोट दिल्यावर काही कंडक्टर १ रु. न देताच मागे जातात. मग माझा stop आल्यावर मलाच कंडक्टरला शोधून राहिलेला १ रु. परत घ्यावा लागतो. तेही त्याची उपकाराची नजर झेलत !
आणि बहुतेकदा त्याच्या खिशात सुट्टी नाणीछान खुळखुळत असतात.
{मंजूजी, हाही एक नेहमीचा}
मंजूजी, हाही एक नेहमीचा अनुभव..फक्त कंडक्टर नाही तर इतरही लोक 'काय कंजूष बाई आहे, एक रुपयाही सुटत नाहीये हातून' या नजरेनं पहात असतील तुमच्याकडे!!
{'आता बोला'}
एकदा आमचे मालक पुण्याला गेले होते. गाडी चालकाला मी टोल व भत्त्ता यासाठि १५०० रु. दिले. जेव्हा त्याने हिशेब दिला तेव्हा १००० परत दिले. ५०० मधे पुण्याला कस जावुन आला अस विचारताना तो बोलला 'टोल वाल्यालाच बसवला गाडीत सगळच वाचल.'
{संध्याजी, हा अशा प्रकारचा}
संध्याजी, हा अशा प्रकारचा भ्रष्टाचार आपल्याभोवती घडतो तेव्हा मी हबकून जाते. शून्य न मोजता येणारे घोटाळे असेच, या प्रवृत्तीतूनच जन्माला येतात हे एक कटू सत्य आहे. आपली लढाई (ती आपण करणारच असलो तर) आपल्याच माणसांशी आहे ...
{>>आपली फक्त 'बघ्यांची' भूमिका}
>>आपली फक्त 'बघ्यांची' भूमिका असावी?
खूप मोठा, आभाळाएवढा मोठा प्रश्न. पण उत्तर कोणाकडेच नाही.
गड किल्लावर भटकताना असे अनुभव अनेकवेळा येतात, अहो तुमच्या अनुभवातील मुलगा १० वर्षाचा तरी होता. पण गडकिल्लावर २०-२५ वर्षापासून ५०-६० वर्षापर्यंतचे तरूण इकडे तिकडे कचरा टाकत फिरताना पाहिले तर डोक्यात तिडिक जाते. बरं सांगायला जावे तर, उचलतो की असा तोरा असतो. व तिकडून उचलून परत तिसरीकडे तो कचरा तसाच टाकला जातो.
कुठलाही गड घ्या, त्या गडावरील पाण्याचे टाके, गुफा ह्या कचर्यानी भरलेले दिसतील. कारण सार्वजनिक स्वच्छतेचे धडे कोणी गिरवून घेतले नाहीत ना कोणी गिरवले आहेत.. हे बदलण्याची सुरवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी लागेल. कचरा योग्य जागी टाकावा हे एवढं जरी शिकले तरी भरपूर झाले. बाकीच्या स्वच्छतेच्या गोष्टी आपोपाप अंगीकारल्या जातील.
Hope is a good thing...
{राजे, अनुभव असा आहे की}
राजे, अनुभव असा आहे की आपल्याला आपल्या हातून काही गोष्टी चुकीच्या आहेत याची जाणीवच नाही लोकांना. प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असे काही म्हणतात - पण लोकांना शहाणपण कधी येणार हा एक प्रश्नच आहे! जमेल तितके करत राहणे एवढेच आपल्या हाती आहे.
{अगदी बरोब्बर...सहमत आहे}
अगदी बरोब्बर...सहमत आहे
----निवेदिता--------
{आभार निवेदिताजी. पण सहमती}
आभार निवेदिताजी. पण सहमती नेमकी कोणत्या मुद्याबाबत आहे हे नीट कळले नाही मला.
{अगदी सहमत }
+१०
अगदी सहमत राजेंशी. अगदी माज आल्यासारखे नडायला लागतात.
दीडशहाण्यांना आपण काहीच शिकवू शकत नाही पण थोडीफार अद्दल घडवू शकतो. आमच्याच इथल्या दुर्गाडी किल्ल्यावरचा वर्षभरापुर्वीचा प्रसंग. नवरात्रीचा उत्सव संपून आठवडा झाला असेल, असाच संध्याकाळी फिरायला मित्रांसोबत गडावर गेलो होतो. फारशी गर्दी नव्हती, पण बहुतेकसे 'कपल्स' होते. अगदी जणू स्वतःला मालिका, चित्रपटातल्या जोड्या समजणारे ठोकळे. गड चढतानाच गणपतीचं छोटंसं मंदिर आहे. तिथल्या दगडी भितींवर हि मंडळी आपापली अजरामर नावं लिहित होती. थोड्यावेळाने आम्हीच प्लान बनवला. एक कपल असंच कोरीव काम करत होतं - समीर - शमिका अगदी दिल, मधेच छेदणारा बाण वगैरे काढून. त्यांचाकडे गेलो खडू मागितला आणि प्रत्येकाची नावाखाली नवीन ग्राफिटी लिहायला सुरवात केली "यांना इथे गाडले". दुसरं नाव होतं सचिन- मेघना लिहून आलो " यांचा ब्रेकअप झाला". काही ठिकाणी, "यांची कबर गडाच्या पायथ्याशी आहे", "ह्या दोघांना मनोरुग्णालयात भरती केले आहे". हे करत असताना ग्रुप मधले मित्र उगीचच जोरजोरात हसत होते, एकदम पाताळविजयम हास्य जेणेकरून लोकांचं लक्ष आमच्याकडे जाईल. हे सगळं बघून काही कपल्सची चलबिचल झाली. काही जण खुन्नसने आमच्याकडे बघत होते, काही जण शरमेने. एक मित्र उगीचच जोरात बोलला, आपण ह्या कोरीव कामाचे फोटो काढूया FB वर शेअर करता येतील. फोटो काढायला उठणार इतक्यात एक जोडी उठली आणि स्वतःच नाव पुसायला लागली. अजून दोन तीन जोड्या उठल्या आणि आपापली प्यार कि निशानी मिटवायला लागल्या. अशीच फिरायला आलेल्या मंडळीनी पण मदत करायला सुरवात केली आणि बऱ्यापैकी नावं कमी झाली. काही महिन्यांपूर्वी गेलो होतो तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला, एकहि नाव दिसलं नाही.
विरोचन
{झक्कास काम केलंत तुम्ही !!!!}
झक्कास काम केलंत तुम्ही !!!!
Hope is a good thing...
{विरोचनजी, चांगल काम केलत}
विरोचनजी, चांगल काम केलत तुम्ही.. त्या सगळ्या प्रकारात तुम्हाला त्या जोडप्यांपैकी कोणी नावही ठेवली असतील ...पण कधीकधी हा मार्ग पत्करावा लागतो नाईलाजाने! एरवी वाईटाने वाईटावर मात करता येते असं मी मानत नाही - पण चांगल्या हेतूने केलेलं काम महत्त्वाच ठरत!
{चांगलं काम केलंत! अभिनंदन!}
चांगलं काम केलंत! अभिनंदन!
-ऋ
{ह्याबद्दल आम्हीही येथे काही}
ह्याबद्दल आम्हीही येथे काही खरडले होते
{लेख तेव्हा देखील वाचला होता व}
लेख तेव्हा देखील वाचला होता व तेथे मत देखील व्यक्त केले होते
वेलकम बॅक देवदत्त.
Hope is a good thing...
{देवदत्त सर, वाचला तुमचा हा}
देवदत्त सर, वाचला तुमचा हा लेख. सहमत आहे तुमच्याशी मी. आपण आपल्यापासून नेहमीच आणि नक्कीच सुरुवात करू शकतो. ती केली पाहिजे.
{काय करता येऊ शकेल यावर चर्चा}
काय करता येऊ शकेल यावर चर्चा घडणे महत्त्वाचे नाही का?
{पाऊलवाट, तुम्हाला काय वाटतं -}
पाऊलवाट, तुम्हाला काय वाटतं - काय करता येईल? काय केलं पाहिजे? तुमच मत सविस्तर वाचायला नक्कीच आवडेल.
{सुरुवात करणे या गोष्टीशी मी}
सुरुवात करणे या गोष्टीशी मी सुध्दा सहमत आहे पण एकदा कराल, दुसर्यांदा कराल मुळात कचरा करणार्यांवर याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही. असाच काहीसा अनुभव रायगडावर पाहिलाय. तिथे तर पावलोपावली दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या सापडायच्या, कित्येक स्वयंसेवकांनी तिथे साफसफाई केल्याचं मला आठवतंय ( बरेचदा मी ही त्यात सामिल होतो ) जाहीर आवाहने केली गेली पण हे उद्योग करणारे करतच राहीले. याचाही त्यांनी कधी विचार केला नाही की गड म्हणजे आपल्या इतिहासातली मानाची पाने प्रत्येक गडासाठी कित्येक बलिदानं गेलीयेत काही कदाचीत आपलेच पूर्वज असू शकतील त्यांच्या स्मृतींची ही अशी हेटाळणी, विटंबना ? अखेरीस तिथल्या गांवकर्यांनी चौदाव्या रत्नाची प्रचिती द्यायला सुरूवात केल्यापासून हे प्रकार कमी झालेत पण थांबले अजिबात नाहीत.
जिथे लोकं मंदिरं लूटायला कमी करत नाहीत देवाचीही पर्वा नसते त्यांना तर माणसाची काय करतील. खरंच हे पाहीलं की वाईट वाटतं. पण आपण गांधीवादी देशातले ना ! त्यांचा कचरा साफ करण्यापलीकडे आणखी काय करू शकतो ?
{आशिष, अखेर माणसांना पर्वा}
आशिष, अखेर माणसांना पर्वा असते तरी कशाची असा प्रश्न मलाही पडतो बरेचदा. आपण समाज म्हणून फार स्वार्थी आहोत अस अनेकदा जाणवतं. दबाब असलाच तर त्यातल्या त्यात लोकमताचाच असू शकतो. पण लोकमत हे दुधारी हत्यार आहे. अनेकदा ते चुकीच्या गोष्टींसाठी आपल्यावर दबाब टाकतं - ते आपण मानत नाही आणि त्यातून नवे विचार येत राहतात. त्यामुळे सरकारने नियम कोणते करायचे आणि जनमत दबाबाच तंत्र कुठे वापरायच हा नेहमीच गोंधळाचा विषय असणार आहे.
{छान आहे लेख. खरच या नव्या}
छान आहे लेख.
खरच या नव्या पिढीला या सर्व गोष्टींची जाणिव करुन देणे अत्यंत आवश्यक आहे.
माझ्या एका सुखवस्तू घरातील मैत्रिणीचा सातव्या ईय्यत्तेत शिकणारा भाऊ म्हणजे जेमतेम १२ वर्षांचा मुलगा, खुप खोडकर म्हणून हॉस्टेलला ठेवला. आता तिथे जाऊन तरी महाशय सुधारतील म्हणाल तर एकदा शाळेतले सर काही कारणास्तव रागावले तर हा त्या सरांना म्हणाला "मास्तर जरा नीट बोला. तुमच्यासारखे १० लोक रोज माझ्या वडीलांच्या हाताखाली काम करतात".
या प्रकारात मला खटकली ती गोष्ट अशी की, हा सगळा प्रकार माझी मैत्रिण मला अश्या काही प्रकारे सांगत होती जणू तिच्या भावाने फार मोठा पराक्रम केला आहे.
एका शिक्षकाची मुलगी असलेल्या मला हे कसे काय पटले असते?
----------------------------------------------------
रहिमन इस दुनिया मे भाती भाती के लोग 
----------------------------------------------------
{प्रतीक्षाजी, लोक आपल्या उद्धट}
प्रतीक्षाजी, लोक आपल्या उद्धट मुलाबाळांचे कौतुक करतात असे नेहमी दिसते. त्यातून त्या मुलांना असेच बोलायची सवय लागते - त्यातच 'मोठेपणा' वाटतो. बाहेरचे किती काय करणार अशा प्रसंगात जर घरातल्यांचाच सुप्त पाठिंबा असेल तर?
आपल्याला आपल्या मुलाला वळण लावता येत नाही म्हणून ते दुस-या कोणाच्या तरी ताब्यात द्यायचे ही मानसिकताही मला नेहमीच विचित्र वाटत आलेली आहे... पण ती आहे.
{गांधीगिरी }
मागे मुंबईच्या रेल्वेत घडलेला प्रसंग आठवला. अजिबात गर्दी नव्हती. एक मुलगा (साधारण १२-१३ वर्षांचा असेल) व त्याची आई प्रवास करत होती. रेल्वेत विकायला आलेली संत्री आईने विकत घेतली. आईने व मुलाने एकेक संत्रे हातात घेतले. साली सोलल्या व मुलाने त्या तिथेच खाली टाकल्या (आईला संत्रे सोलायला जमतच नव्हते
). मी म्हटले "सालं इथे टाकु नकोस", आई व मुलगा दोघांनीही लक्ष दिले नाही.
मी उभा राहिलो, डबा आता काय होते हे बघु लागला, मी खाली वाकलो आणि ती साले गोळा केली आणि माझ्याजवळ सलेल्या प्लॅस्टीक पिशवीमधे ती भरू लागलो. आई-मुलगा चमकले मग ओशाळले. आईने मग मुलाला खुण केली अन त्याने उरलेली साले उचलून घेतली
==
तेव्हमाबढाई म्हणून सआंगत नाही पण अश्यावेळी वाद घालण्यापेक्षा गांधीगिरी उपयोगाला येतेच येते हा स्वानुभव
-ऋ
{सहमत आहे.}
कचर्याच्या बाबतीत हे करू शकतो, पण वरती सविताजींनी सांगितलेल्या सीटवर उभा राहणार्या पोराच्या बाबतीत गांधीगिरी कशी करणार?
शिवाय हे गांधीगिरी प्रकार सस्टेनेबल नाही. कडक शिक्षा आणि काटेकोर नियमांचे पालन हाच एक उपाय आहे.
पण दुर्दैवाने भारतीयांचा अहंकार देशापेक्षा मोठा आहे आणि देशप्रेम ही फक्त दाखवण्याची गोष्ट आहे.
{सहमत.}
सहमत.
करतो. करेन. व करेगें
{गांधीगिरीचा प्रश्न}
निरंजन यांच्या मताशी मी सहमत आहे ऋषिकेश.
तुम्ही दाखविलेली (केलेली) गांधीगिरी स्पृहणीय नक्कीच आहे यात शंका नाही. पण ती सर्वच ठिकाणी चालत नाही. काहीवेळा पिंडीवरील विंचवाला खेटरच दाखवायची वेळ येते. तिथे गांधीमात्रा चालत नाही हे तुम्हीही मानाल. निरंजनने सविताच्या 'मेट्रो' अनुभवाबाबत उभी केलेली शंका रास्तच आहे. तसेच त्या कंडक्टरच्या बाबतीत कोणती गांधीगिरी आपण करू शकू ? 'पोलिस स्टेशनवर गाडी घ्या' असे म्हटल्यावर खिशातून दोन रुपयाचे नाणे कसे आले ?
इकडील भागात टू व्हीलरमध्ये पेट्रोल भरताना २०० रुपयाचे भरा असे अटेन्डंट्ला सांगितले तर तो स्वतःला जॉन अब्राहम कुळीतील हीरो समजणारा गंप्या रु.१९९.६७ पैशाला थांबतो (स्वयंचलित मीटर डिस्क बंद आहे असे उत्तर मिळते). आता उरलेल्या ३३ पैशासाठी त्याच्याबरोबर भांडणे म्हणजे 'बघ्यांच्या' दृष्टीने सध्या मूर्खपणाचे झाले आहे. पाठीमागील रिक्षावाला लागलीच भोंपू ठाणठाण बडवितो. प्रश्न ३३ पैशाचा नसून तो अटेन्डंट दिवसाढवळ्या आपला 'मामू' करीत आहे याचे कुणालाच कसे वैषम्य वाटत नाही याचा आहे. [वर फुकटचा शेरा, "जाऊ दे ओ, काय ३३ पैशात येतंया ?"]
अशा ठिकाणी गांधीगिरी करायची म्हणजे नेमके काय करावे लागेल ?
{सविताजींनी सांगितलेल्या सीटवर}
गांधिगीरी हे सोपे नक्कीच नाही किंबहुना त्या मुलाला ओरडणे, आईला बोलणे यापेक्ष कितीतरी कठीण आहे.
काहि पटकन पर्याय सुचले.. ते पूर्ण विचारांती देत नाहिये त्यामुळे याला पटकन आलेले विचार इतपतच महत्त्व द्यावे
पर्याय १. एखादा त्या मुलामुळे सीटवर आलेले डाग पुसू लागला असता तर आईला अधिक लाज वाटली असती असे वाटते.
पर्याय २: मुलाला सांगावे अरे तुझे बुट देतोस का मला? त्यामुळे सीट खराब होतेय. बुट काढ आनि मग सीटवर चढ. बहुदा अधिक परिणाम व योग्य तो संदेश गेला असता
पर्याय ३ (ह. घेण्यासाठी): स्वतःच मुलासारखे सीटवर उभे राहिला असता तर इतर लोक बोलले असते की हे काय सीट खराब होते
तेव्हा बोलता यावे की आता त्या स्त्रीला आधी सांगा मुलाला आवर नाहितर मला का आवरता 
@ अशोकपाटीलः
३३ पैशासाठी हुज्जतही घालु नका आणि ते दिल्याशिवाय लाईनही सोडू नका. शांतपणे उभे रहा म्हणा ३३पैसे दे किंवा पुर्ण पेट्रोल दे नाहितर मी हलणार नाही. गांधीगिरी म्हणजे प्रतिकार न करणे नव्हे
-ऋ
{ऋषिकेशजी, नगरी निरंजनजी,}
ऋषिकेशजी, नगरी निरंजनजी, काटकरजी, अशोकजी पाटील,
ऋषिकेशनी जे केलं ते योग्य केलं - पण सर्व परिस्थितीत या प्रकारे वागता येईल आणि अशी वागणूक (गांधीगिरी हा शब्द मला आवडत नाही!) परिणामकारक ठरेलच याची खात्री नसते. सेनापती बापटांना 'अहो, काल आला नाहीत तुम्ही झाडू मारायला, कचरा साठला ना इकडे' असं लोकांनी सुनावल्याची हकीकत (खरी की खोटी ते माहिती नाही - पण खरी वाटावी अशीच आहे ती) मी वाचली होती. अनेक लोक ढिम्म असतात आणि एकदा असाच कचरा मी रेल्वेत उचलल्यावर 'अहो इकडे पण पडलाय बघा' असं एका सहप्रवाशाने मला सांगितल्यावर मला हसावं की रडावं ते समजलं नव्हत. 'शहाण्याला शब्दाचा मार' ही म्हण खरी आहे तशीच दुसरीही म्हण आहे - 'झोपी गेलेल्याला जागं करता येत, झोपेचं सोंग घेणा-याला नाही' - ते ध्यानात ठेवावं लागतं अधूनमधून का होईना.
'गांधीगिरी सस्टेनेबल नाही' या नगरी निरंजन यांच्या मताशी म्हणून मी सहमत आहे.
अशोकजी म्हणतात तेही मला पटतं - कधी भावनेला आवाहन करून, कधी भीती दाखवून, कधी कायद्याची मदत घेऊन, कधी सत्याग्रह करून हा मुद्दा रेटावा लागतो. कोणती नीति कोणत्या परिस्थितीत योग्य आहे हे स्थळ-काळानुसार आपल्याला ठरवावं लागत. कधी बाण अचूक लागतो - कधी तो आपल्यावरच उलटतो.
ऋषिकेशजी, तुमचा पर्याय ३ -वाईटाने वाईट मोडीत निघतं हे मला मान्य नाही - जरी हेतू चांगला असला तरी मी त्या सीटवर उभ राहून काय चांगल शिकवणार आहे त्या मुलाला? मी त्या मुलाची चुकीच्या वागण्यात बरोबरी नक्कीच करू नये - करणारही नाही.
{:)}
पर्याय३ हलकेच घेण्यासाठी होता. डोळा मारणारी स्मायलीही काढली होती.
असो.
-ऋ
{ऋषिकेशजी, मी ब-यापैकी}
ऋषिकेशजी, मी ब-यापैकी 'स्मायली निरक्षर' गटात मोडते .. त्यामुळे माफ करा विनोद न समजल्याबद्दल.
{लाँगटर्म सोल्युशन?}
सगळ्याच्या मूळाशी 'सब चलता है' हाच विचार आहे. नागरीक-शास्त्र म्हणजे २० मार्क एकढंच. त्यापलिकडे आपल्याला त्याच्याशी काहीच घेणंदेणं नसतं. गांधीगिरीकरून काही प्रश्न तात्पुरते सुटतीलही पण लाँगटर्म सोल्युशनचा पण विचार व्हायला पाहिजे.
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
{लेटेस्ट माहिती सांगतो... ५वी}
लेटेस्ट माहिती सांगतो...
५वी ते १० वी च्या मुलांना नागरिकशास्त्र म्हणजे काय विचारले माहिती नाही हे उत्तर आहे, व शालेय पुस्तकांत मला तरी दिसले नाही नागरिकशास्त्र यांच्या
Hope is a good thing...
{शालेय अभ्यासक्रमातील}
शालेय अभ्यासक्रमातील नागरिकशास्त्राच्या अभ्यासाची माहिती (किंवा लिंक) आहे का कोणाकडे? काय शिकवतात ते तरी पाहू आजकाल. अर्थात आमच्या पिढीला पुष्कळ काही शिकवायचे तरी पण आम्ही दिवे लावलेच आहेत म्हणा!
{कोणत्या बोर्डाचे विद्यार्थी}
कोणत्या बोर्डाचे विद्यार्थी आहेत हे? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र हा विषय शिकवला जातो. इतिहास आणि नागरिकशास्त्र यांना एकत्रपणे समाजशास्त्र असे म्हंटले जाते.
नीलपक्षी
{'सब चलता है' पासून कशी सुटका}
'सब चलता है' पासून कशी सुटका करून घ्यायची हा एक यक्ष प्रश्नच आहे म्हणायचा!
{'सब चलता है' पासून कशी सुटका करून घ्यायची हा एक यक्ष प्रश्नच आहे}
सुरुवात स्वतःपासून केली तर?
"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.
{इब्लिसजी, फक्त आपण सुरुवात}
इब्लिसजी, फक्त आपण सुरुवात करून, योग्य वागून सुटका होत असती तर हा प्रश्न पडलाच नसता. जे स्वतःपासून सुरुवात करतात, ते जास्त गुंतत जातात या प्रश्नात असं माझ मत आणि अनुभव. आपण सुरुवात केलीच नाही तर मनःस्तापही होत नाही!!