राग कलिंगडा

0
0

काही दिवसांपूर्वी 'कलिंगड कसे निवडावे' च्या धाग्यावर अदितीतैंनी राग कलिंगडा गावा नि मग निवडावे असे लिहिले. त्यावर आम्हाला आमचे सांगीतीक ज्ञान पाजळण्याची इच्छा झाली आणि तो 'कालिंगडा' आहे असे लिहिले. इथे एक आश्चर्य जाहले. साक्षात मिराशीबुवाच अवतरले आणि त्यांनी आमची चूक दाखवून दिली. आम्ही लगेच 'वाकून त्यांना नमस्कार केला' (प्रत्यक्षात नाही केला पण जालावर असे लिहायची पद्धत आहे म्हणे, जरा इंप्रेशन पडते म्हणे) त्यानंतर आम्ही बुवांच्या पायाशी बसून थोडे ज्ञानग्रहण केले. बुवांशी झालेला संवाद इतरांच्या माहितीसाठी इथे देत आहोत.


पुपे उर्फ मिराशीबुवा:
आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. कलिंगड हा राग हल्ली फार प्रचलित आहे. पण ते त्या रागाचं मूळ स्वरुप नव्हे. मूळ राग कलिंग. परत हा सुधा जोड राग. 'रामकली' आणि 'इंगलबहार' या रागांपासून बनलेला. खाँसाहेब दुव्वेखां, बेळ्ळ्गांव घराना (जोडरागी हे उपनाम. काल १७६१ ते १८६२. शतायुषी होते ते. त्यानी त्यांच्या आयुष्यात अनेक जोडराग बनवले) यांनी बनवला. मूळ स्वरुपात त्यांचे शिष्य विलंभट्ट उरुसकर (१८५०-१९२०) यांनी प्रचलित केला. त्यांचे शिष्य व जेष्ठ संगीतनट आण्णाबुवा तानकर (१९०१-१९८०) यांनी या रागाला अनोख्या 'अडा चौताल' या तालात गायला सुरुवात केली. त्याला (रागाला आणि प्रस्तुत नटाला) लोकांनी इतके डोक्यावर घेतले की तो रागच कलिंगडा या नावानं प्रसिद्धी पावला. विषय निघाला म्हणून सांगितले. असो.

आता असा गुरू भेटल्यावर आम्ही काय सोडतो काय. लगेच खरडवहीत बुवांचे पाय धरले आणि आमची शंका एक विचारली. ओवर टू खरडवही:


आम्ही: बुवा 'गुणकली' आणि 'इंगलबहार' यांच्या जोडरागाला काय म्हणावे?

पुपे उर्फ मिराशीबुवा:
ते दुव्वेखांसाहेबांनी कुठल्या थाटाने गायला आहे त्यावर अवलंबून. १.कलिंग हा थोडासा गुणकली थाटाने पण थोडासा इंगलाशी लगट करत जातो. परंतु बहाराच्या थाटाने गायला असता कलीबहार, गुणबहार हेही शक्य आहेत. परंतु गुणींगल कधी कोणी गायल्याचे ऐकिवात नाही.

पूर्वी डॉ. पाटमांड्याचे दुर्मिळ पुस्तक "भारतीय रागसंकरातील बहूदुधी काव्यधेनू" हे वाचनात आले होते. त्यात ज्ञानी गुणवंतबुवांच्या (हे उत्त्तम चिपळीवादक होते) मताचा हवाला देऊन दुव्वेखां साहेबांनी गुणींकल बावडा संस्थानात गायचा प्रयत्न केला होता परंतु अतीव तांत्रिक करामती कराव्या लागत असल्याने "त्यातील गोडी क्षीण होते आणि असे अभिरुचीहीन राग देण्यापेक्षा नवीन रागच रचिन" असे म्हणून सोडून दिला होता असे वाचनात आले.

पुन्हा एकदा आम्ही आमचे ज्ञान पाजळले.

आम्ही:
>>कलिंग हा थोडासा गुणकली थाटाने पण थोडासा इंगलाशी लगट करत जातो.
इथे प्रसिद्ध संगीतसमीक्षक डॉ. शेखर (खेचर?) फाटमारे यांनी थोडा मतभेद दर्शविला आहे. त्यांच्या मते कलिंग हा मूळचा 'स्फुल्लिंग' राग आहे. 'रागसंगीतातील नवरस' हे त्यांचे (ठाण्याच्या '' प्रकाशनाने प्रकाशित केलेले) पुस्तक तुम्ही वाचले आहे का? (नसेल तर वाचा, चाळीस वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली पहिली आवृत्ती अजूनही उपलब्ध आहे, मूल्य रु. पाच फक्त, पुन्हा एका प्रतीवर एक फुकट) त्यात हा राग हा मूळचा वीररसाचा राग म्हणून ओळखला जात असे असे म्हटले आहे. परंतु सम्राट अशोकाने कलिंगविजयानंतर अहिंसेचा स्वीकार केला तेंव्हा रागगायकांना आदेश देऊन याचे नाव 'कलिंग' असे बदलले. हे करतानाच त्यातील 'मारे-रे-रे-मारे' ही पकड बदलून 'रे-माS-रे-माS-माSS' अशी सोज्वळ केली. त्यामुळे आता हा राग गुणकलीचे रंग दाखवू लागला आहे. तसेच हा एकमेव वीररसाचा राग जवळजवळ अस्तंगत झाल्याने आज आपण संगीतात सगळे रस दिसतातच कुठे असे निर्लज्जपणे विचारतो. बाकीचे बीभत्स वगैरे रस गायकीत नसले तरी गायकात दिसू शकतात त्यामुळे त्यांची अनुपस्थिती एवढी जाणवत नाही. असो.

ठाणे घराण्याने अजून याचे मूळ रूप जपले अहे. संधी दिल्यास ऐकवतात. की तू नळी वर टाकायला सांगून मुखपृष्ठावर लिंक द्यायला सांगू? सध्या धंदा (म्हणजे गाण्याचा हो) मंदा आहे त्यामुळे थोडा वेळही असेल त्यांना.

यावर बुवांनी सांगोपांग चर्चा करून आमच्या ज्ञानात बरीच भर घातली. त्यातला काही भाग.

पुपे उर्फ मिराशीबुवा:
>> त्यांच्या मते कलिंग हा मूळचा 'स्फुल्लिंग' राग आहे.
शक्यता आहे. संगीत विकासात वेदोत्तर, आर्योत्तर, अशोकोत्तर, अकबरोत्तर, शिवाज्योत्तर असे अनेक कालखंडीक बदल होत गेले असे मागे पाटमांडे यांनी म्हटले होतेच. परंतु तेव्हाच्या रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने ते 'पुराव्याने शाबित' करता येणार नाही इतकेच. परंतु अशोकोत्तर स्फुल्लिंगाची दशा ओढमपूरला खर्जी स्वरलिपीत पहायला मिळतात त्यामुळेच केवळ हा इतिहास सामोरा आला. असो. थोरांचे उपकार.

>>ठाणे घराण्याने अजून याचे मूळ रूप जपले अहे...
ठाणे घराण्याबद्दल बरेच ऐकून आहे. परंतु हल्ली नरड्यात मजा नाय त्यांच्या असे क्यालिफोर्नियाधीश समीक्षक विरजणकरांच्या बोलण्यात (म्हणजे लिखाणात) आले.


आम्ही:
आपल्यासारख्या संगीतचूडामणींशी संवादाचे भाग्य आम्हास प्राप्त झाल्याने कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. (नाही आमच्या दातांच्या जागी छपाईचे खिळे बसवलेले नाहीत.)
>> संगीत विकासात वेदोत्तर, आर्योत्तर, अशोकोत्तर, अकबरोत्तर, शिवाज्योत्तर असे ... 'पुराव्याने शाबित' करता येणार नाही इतकेच.

अतिशय मौलिक माहिती. श्री. फाटमारे यांनीही या बदलांची सांगोपांग चर्चा केली आहे. यात 'जालसंगीत' किंवा 'संगणकोत्तर संगीत' हा आणखी एक विभाग त्यांनी कल्पिलेला आहे. पहा: 'रागसंगीतातील नवरस' चे अपेंडिक्स (म्हणजे पुरवणी हो, नाही तिथे डोकवाल नाही तर). या जालसंगीताच्या सर्व रेकॉर्डस् तू-नळीवर उपलब्ध असल्याने या अभ्यासाला भक्कम पुरावा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व्य. नि. करा (कोणाला ते तुम्हाला ठाऊक आहेच).
>> ठाणे घराण्याबद्दल ... क्यालिफोर्नियाधीश समीक्षक विरजणकरांच्या बोलण्यात (म्हणजे लिखाणात) आले.
हम्म आम्हास अनुभव नाही. परंतु खुद्द क्यालिफोर्नियाधीशांची समीक्षाबुद्धी हल्ली उतरणीस लागली आहे असे ठाणेदारांचे मत असल्याचे समजले. माडीवरल्या गाण्याची प्रत्यक्षानुभूती नसल्याने त्यांची संगीतप्रज्ञा कुंठित झाली आहे असे ठाणेदार कुणाशी तरी बोलल्याचे ऐकण्यात आले.. बाकी ही तारकांची लढाई, आम्हा पामरांचे त्यात काय काम. इत्यलम्.


यानंतर बुवांनी आमच्या पुढील सांगितीक प्रवासाला शुभेच्छा दिल्या आणि प्रस्थान करण्याचा मनोदय जाहीर केला. परंतु आम्ही गुरूदक्षिणा दिल्याशिवाय कसे जाऊ देणार होतो त्यांना. त्यांनी वारंवार नकार देऊनही आम्ही हटून बसलो. तेव्हा त्यांनी रागाने 'तुमच्या दोन्ही हाताचे अंगठे द्या' म्हणौन सांगितले. आम्हाला एकाच वेळी एकलव्य नि गालवाचे दु:ख देण्यामागचा त्यांचा उद्देश आम्हाला उशीरा समजला. अंगठ्याशिवाय आम्ही कळफलकावरील 'अवकाश पट्टी' (पक्षी: स्पेस बार) दाबू शकत नसल्याने सदर ज्ञान संगणकाच्या माध्यमातून आम्ही इतरांपर्यंत पोहोचवू नये जेणेकरून त्यांचे घराणेदार गायकीचे ज्ञान ऐर्‍यागैर्‍याहाती पडू नये असा सद्हेतू असावा असे वाटले. अर्थात गुरूदक्षिणा देण्याआधीच हे टंकून आम्ही आपणापर्यंत पोचवले आहे. इति लेखनसीमा.

(ता.क. वरील लेखनात पुरेसे स्पष्ट झाले नसावे. पण पुपे उर्फ मिराशीबुवा म्हणजे पुण्याचे पेशवे. तिरपा ठसा त्यांनी लिहिलेल्या खरडींचा)

{य़ेsssss}

1

यावे, यावे... तेव्हाच आम्ही मिराशीबुवांना सूचना केली होती की हा सांगितीक संवाद येथे प्रसिद्ध करावा. त्यांनी त्यास नकारही दिला नाही किंवा होकारही. आज आपण हे काम केलेत. याबद्दल आ-भार!
च्यायला, या दोघांनी असे विषय घेऊन संवाद चालू ठेवावा. गरज असेल तर राजे, या दोघांसाठीच एक वेगळा धागा सततचा खुला ठेवता येतो का पहा!

{बुवांनी गंडा घातलेला ..आय मिन}

2

बुवांनी गंडा घातलेला ..आय मिन बांधलेला दिसतोय तुम्हाला...
बाकी कुठल्या घराण्याचे झालात आता आपण अंगठे दाखवून..? हास्य


पुष्करिणी

{बुवांनी गंडा घातलेला ......}

3

Laughing out loud बुवांनी गंडा घातलेला ......

{अंगठे दाखवून?}

4

अहो अंगठे लपवित फिरतोय आता. नाहीतर टंकणार कसे. जाऊ द्या हे सगळे गुरू असेच. काय सांगायचं आता.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{बा ह प ह रे! आपले सांगितिक}

5

बा ह प ह रे! आपले सांगितिक ज्ञान, आंतरजालीय अभ्यास आणि लेखनशक्ती पाहून आपल्या चरणी नतमस्तक!

{बा ह प ह रे! आपले सांगितिक}

6

बा ह प ह रे! आपले सांगितिक ज्ञान, आंतरजालीय अभ्यास आणि लेखनशक्ती पाहून आपल्या चरणी नतमस्तक!

चुकीचे असे टाचण दिले आहे.

गुरुगृही राहुन गुरुमुखातुन शिकली जाते ती खरी विद्या !!

पंडित
परा भयंकर

{पराबा, तुम्ही म्हणता ते सगळं}

7

पराबा, तुम्ही म्हणता ते सगळं ठीक आहे, पण ज्या लोकांना गुरूगृही रहाणं शक्यच नसतं, ज्या लोकांना हिरवा माज असूनही गाणं शिकण्याची खाज असते अशा रास लोकांसाठी पंडीत मिराशीबुवा पुणेकर श्री. रम-ता-राम यांच्या सहाय्याने जर गाणं शिकवत असतील तर तुम्हाला का त्याचा राग हो?

तुम्ही पंडीत असाल हो पराखां, पण आमच्यासारख्या कानसेनांसाठीही काही प्रयत्न होत असतील तर त्याने भारतीय अबेजात संगीत वाढेलच ना??

{पंडित}

8

पंडित आणी खाँ? खाँ असतील तर ते 'उस्ताद' असणार ना. (ते वस्ताद आहेत हे तर आम्हाला ठाऊक आहेच) Big smile


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{सर्वधर्मसमभाव हो रका.}

9

सर्वधर्मसमभाव हो रका.

{वा वा वा!!!! रमत्यारामाने या}

10

वा वा वा!!!!
रमत्यारामाने या संवादाला धाग्याचे रुप देउन आमच्या ज्ञानात भर घातली त्याबद्दल त्यांचे आणि बुवांचे आभार.

(अंतरीच्या कळा: भर??? लेका घागर रिकामी रे तुझी. चार चौघात कबुल करायला लाज वाटते का?)


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{साधु!!! साधु!!! अहह!!! आज हा}

11

साधु!!! साधु!!! अहह!!!

आज हा परमज्ञानवर्धक गुरूशिष्यसंवाद वाचून आमचे भरून आले... डोळे. दाटून आला... कंठ. अजून बरेच काही झाले पण ते इथे नाही लिहित. गरजूंनी व्यनि करावा. तर सांगायचा मुद्दा असा की, हा संवाद आम्ही प.प्पू. मिराशीबुवा आणि रामभाऊ (कुठेही रमणारे) यांच्या खरडवहीत वाचला होताच. आज परत वाचौन तेसमयी झालेला मोद पुनर्प्राप्त झाला. असो, इति गानबोध नाम गुरूशिष्यसंवाद सुफळ संपूर्ण जाहला.

पण आम्ही इथे एक गोष्ट प.प्पू. मिराशीबुवांच्या नजरेस नम्रपणे आणून देऊ इच्छितो.... त्यांनी संगीतातील (म्हणजे गाण्यातील, संगीता नावाच्या पोरीतील नव्हे) कालखंडिक बदलांबद्दल लिहिताना वेदोत्तर, आर्योत्तर, अशोकोत्तर, अकबरोत्तर, शिवाज्योत्तर असे अनेक कालखंड उद्धृत केले पण मॅकॉल्योत्तर कालखंड मात्र विचारात घेतला नाही. असे का बरे? ही नजरचूक का प.प्पू. मिराशीबुवांचे या कालखंडाबद्दलचे अज्ञान म्हणावे? असो... त्यांनी त्याबद्दलही लिहावे अन्यथा आम्हाला संगीतचूडामणी श्री. श्री. नानाबुवा आवळे यांना पाचारण करावे लागेल.

इत्यलम्

{आपण प्रश्न विचारला आहे तर}

12

आपण प्रश्न विचारला आहे तर आम्ही उत्तर देणे लागतो.
मॅकॉल्योत्तर कालखंड: भारतात राहून पश्चिमेकडे तोंड करून बसलेल्या काही गायकांनी "संगीत जे काही आहे ते केवळ पश्चिमेतच आहे व ते तिकडूनच इकडे आले" अशा पोकळ दाव्यांचा पुरस्कार केला होता. म्हणून त्या काळाचा उल्लेख स्वाभिमानी बडे लटकनखाँ साहेब करीतच नसत. तोच वसा पाटमांड्यांनी चालवला व मॅकॉलेला अनूल्लेखाने मारले.


-पुण्याचे पेशवे

{कोण}

13

नानाबुवा आवळे?...

नाही नाही, असे म्हणून आम्ही विषय टाळणार नाही. नाना म्हणजे 'रागसंगीतातील भूलतत्त्वे' चे
माननीय लेखक हे आम्हास ठाऊक आहे. तुम्ही जो मेकाल्योत्तर संगीताचा उल्लेख केला आहे तो दावा त्यांनी याच पुस्तकात प्रथम विस्ताराने मांडला आहे. अनेक संगीतसाधकांनी त्यावर साक्षेपाने आक्षेप घेतले आहेत. त्यांचा हा दावा देहाती घराण्याचे घग्गे पनीर खाँ यांच्या मताआधारे मांडला आहे. पाट्मांडे यांचे शिष्य नि पाटीयाळा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद बडे खुले हुसेनखाँ यानी मेकाल्योत्तर संगीतात जे बदल दिसून येतात ते केवळ शैलीभेद आहेत असा दावा केला आहे. पाटीयाळा घराण्याचे उस्ताद गब्दुल सलीम खाँ यांच्या १२ व्या शतकात बांधलेल्या काही बंदिशी याच अंगाने बांधल्या आहेत असे त्यांनी निदर्शनास आणले आहे. या प्रकारच्या गायकीमध्ये 'बंदुकी'च्या गोळीप्रमाणे जाणार्‍या ताना आणी काही 'पुस्तकी' सरगम यांचा चांगला मिलाफ आढळतो असे म्हणतात. एरवी वादी सूर हा रागाचा बादशहा मानला जातो. इथे त्याला गुलामासारखे राबवून घेतले जाते. त्याचा वावर संपूर्ण गायनात असला तरी तो दुय्यम भूमिकेत असतो, रागाचे मूळ आकर्षण हे क्वचित लागणारा 'ई' कार वा 'ऊ' कार असतो. ज्यांनी अलिकडे वसंतरावांनी प्रचलित केलेला राजकल्याण ऐकला असेल त्यांच्या लक्षात येईल की त्यातील पंचम जसा जिवाला हुरहुर लावणारी प्रतीक्षा करायला लावतो तसेच काहीसे या गायनात होते, असे ढोबळ मानाने म्हणता येईल. अर्थात् वादी स्वराला दुय्यम भूमिका घ्यायला लावून रागस्वरूप बिघडू नये याची काळजी घेणे ही तारेवरची कसरत आहे, ती सर्वानाच जमेल असे नाही. यासाठी अन्य प्रतिसादात आमचे 'परा'त्पर गुरू पराखाँ यांनी म्हटल्याप्रमाणे ही विद्या गुरूगृही राहून गुरूमुखानेच घ्यावी लागेल.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{अरे}

14

अरे आवरा रे यांना कोणी तरी. हसवून हसवून मारणार दिसतंय...
ओ पण यात वसंतराव कसे आले?

{उदाहरण}

15

पण यात वसंतराव कसे आले?
उदाहरण म्हणून. अर्थातच तो उल्लेख गंभीरपणे केलेला आहे. वसंतरावांच्या राजकल्याणवर आमचा फार जीव. त्यांच्या मारव्यापेक्षाही राजकल्याण आम्हाला अधिक आवडतो. अर्थात 'आम्ही कोण' हा प्रश्न आहेच.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{आदरणिय रामभाऊ (कुठेही रमणारे)}

16

आदरणिय रामभाऊ (कुठेही रमणारे) आपण दिलेल्या अतिसूक्ष्म विश्लेषणाबद्दल आपले किती मानू... आभार, तेच कळत नाहीये. आपल्या सारखे साक्षेपी आणि निक्षेपी तज्ज्ञ आहेत म्हणून ही अतिप्राचीन कला (म्हणजे आर्ट, पोरगी नव्हे) नुसतीच टिकली नाही तर तिचं प्रसरण झालं, आय मीन प्रसार झाला.

आपण पंडित नानाबुवांचा जो काही योग्य शब्दात समाचार, आय मीन आढावा घेतला तो केवळ अवर्णनिय. पण आपण पाटमांड्यांचे शिष्य काढदांडे यांनी लिहिलेले 'संगीताची नाना रूपे' हा ग्रंथराज वाचलाच असेल. (संगीताची म्हणजे गायनाची हो...) त्यात त्यांनी, मेकाल्योत्तर गायनशैलीचे अनाठायी उदात्तीकरण केल्याबद्दल उस्ताद धुध्धुखाँ यांची जी काही धुलाई केली आहे ती मुळातून वाचण्यासारखी आहे. मेकाल्योत्तर शैलीमधे मधून मधून गायक काही विशिष्ट सूर (चुकुन विशिष्ट सेवा असे लिहिणार होतो, सवय फार वाईट हो... काय करणार?) एकदम किंचाळल्यासारखे करत आणि संपूर्ण शरीरच अनाकलनिय रित्या हलवत गाण्याचा लुफ्त रसिकांसाठी उधळतात हे काही पूर्वसूरींना मान्य नसल्याचेही नमूद आहेच.

एक विनंती.

"विद्या गुरूगृही राहून गुरूमुखानेच घ्यावी लागेल." या वाक्याचा विस्तृत परामर्श घेता येईल काय? कारण विद्या, मुख इत्यादी शब्द वाचून आम्ही अंमळ गोंधळून गेलो आहोत. विद्या कशी असते? ती गुरूमुखातून घ्यायची म्हणजे काय? कृपया विवरण करावे.

{या वाक्याचा विस्तृत परामर्श घेता येईल काय? }

17

बाप रे, ही भलतीच जबाबदारी आहे हो.

"विद्या गुरूगृही राहून गुरूमुखानेच घ्यावी लागेल." असे जेव्हा पराखॉं म्हणतात तेव्हा त्यात खोल अर्थ दडलेला असणार. म्या पामराने तो काय सांगावा. कदाचित 'गृह्णाती' म्हणजे 'ग्रहण करणे' आणि 'गृह' म्हणजे 'तिथे ग्रहण करायचे ती जागा' असा एक अर्थ लागू शकतो. आता 'विद्या गुरूगृही राहणार की विद्यार्थी' हा पुन्हा गोंधळात पाडणारा मुद्दा होऊ शकेल. आमच्या मते येथे एकाद्या वैयाकरणाची मदत घेणे अत्यावश्यक आहे.

गुरूमुखाने विद्या घेणे हा मात्र सहज समजणारा वाक्प्रचार आहे. ते कवी लोक म्हणतात ना 'या हृदयीचे त्या हृदयी' तसे 'या मुखीचे त्या मुखी' (पुढचा तपशील विचारू नका. तुमच्या लग्नात तांबूल्-भक्षणाचा विधी झाला होता ना? त्या अनुभवावरून डिटेलिंग करा.)

आमचे मित्र डॉ. लंबोदर मोसंबी यांनी यावर मार्क्सवादी दृष्टीकोनातून भाष्य केले आहे. त्यांच्या मते गुरूगृही राहून शिक्षण घेणे म्हणजे एक नवीन व्यवस्था निर्माण करणे आहे. कोणत्याही व्यवस्थेमध्ये वैयक्तिक हक्कांचा संकोच होतो आणि प्रगतीला खीळ बसते. त्यामुळे ही व्यवस्था - अन्य कोणत्याही पारंपारिक व्यवस्थेप्रमाणेच - त्याज्य मानली पाहिजे. आम्ही त्यांना विचारले होते की मग तुमच्या मते विद्याग्रहण कसे करावे. पण त्यांनी भावी वर्गविग्रहानंतरच याचे उत्तर मिळेल असे काहीसे उत्तर दिले. आम्ही त्या वर्गविग्रहाची वाट पाहतो आहोत (म्हणजे आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळावे म्हणून.)


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{_/|\_ मी पामर ह्या विषयावर}

18

_/|\_

मी पामर ह्या विषयावर काय बोलणार ... !


Hope is a good thing...

{_/\_}

19

_/\_

{आमाला ते घराणि बिराणी कायाबी कळत नाय बघा}

20

किराणा म्हनल की आम्हासनी फ़क्स्त गावातल्या शिवापा वान्याच किरणा भुसार दुकान तेवढ ठाव हाय बघा. तिथबी आता उधारी लै -हायल्या म्हनताना जात नाही. जाती वरन आठावल, सुन न्हाइतर जावाइ हुडकायच्या टायंबाला मातुर घरान बघत्याशिवाय आमी पेशर (अवो जोर वो जोर.) टाकत न्हाइ सामने वाल्या पार्टीवर.

अन राग म्हनाल तर आम्च्या बाचा राग तेवधाच ठाव हाय. आख्या गावत कुनाची टाप न्हाइ तेच्या समोर. असला राग ,असला राग राव आवाज ऐकुन कलिंगड काय नार्योळ फ़ुटाया पायजे जाग्यावर


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{वर्ज्य स्वर}

21

काही रागात काही स्वरांना बंदी असते तर काही स्वरांना उत आलेला असतो. काही घरानी दुसर्‍या घरान्याच्या असुयेतुन नवीन राग बनीवत्यात. त्यात त्यातुन वर्ज्य स्वरांना उत येतो. अशा विषयी काही माहीती वेगळ्या धाग्यात देत आहे


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{चर्चा}

22

ह्या विषयावर मला आपल्याबरोबर एकदा सविस्तर चर्चा करायची आहे ! Big smile

{प.प्पु. मिराशीबुवा आणी}

23

प.प्पु. मिराशीबुवा आणी रमताराम या दोघांना पूनम वर बसवुन हाटेल बंद करुन घ्यायला पाहिजे (त्यांची चर्चा पूर्ण होईपर्यंत)

{लै भारी}

24

उस्ताद रराखाँ

क्या बात क्या बात..... क्या बात! (कॉपीराईट - मिथुनदा व मसंप्रथमप्रयोग टारु)